
मुक्ती फाऊंडेशनतर्फे महिलांचा गौरव: कल्पनाताई पलिकुंडवार यांना ‘श्री. नारीशक्ती पुरस्कार.
चंद्रपूर/महाराष्ट्र
दि.12 मार्च 2025
प्रतिनिधी: चंद्रपूर शहर
सविस्तर बातमी :- चंद्रपूर – मुक्ती फाऊंडेशनच्या वतीने समाजातील तळागाळातील महिलांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी संस्कार कार्यक्रमाने झाली आणि संपूर्ण सोहळा वैदिक व आध्यात्मिक पद्धतीने साजरा करण्यात आला. समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करताना त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात आली.
विशेषतः, कोणत्याही परिस्थितीत आपल्या कर्तृत्वाने समाजात सकारात्मक बदल घडवणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये भाजी विक्रेत्या महिलांपासून ते किर्तनकार आजीबाईंपर्यंत सर्वांचा समावेश होता. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुक्ती फाऊंडेशनच्या सौ. मंजुश्री कासनगोड्डूवार, प्रा. प्रज्ञा गंधेवार आणि संपूर्ण टीमने पुढाकार घेतला.
यावेळी महाविदर्भाच्या संपादक कल्पनाताई पलिकुंडवार यांना ‘श्री. नारीशक्ती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. आपल्या भाषणात त्यांनी कल्पनाताईंच्या पत्रकारितेतील योगदानाचा आढावा घेतला आणि त्यांच्या ३० वर्षांच्या पत्रकारितेतील अथक परिश्रमांचे कौतुक केले.
कार्यक्रमात अॅड. क्षमा धर्मपुरीवार यांची विशेष उपस्थिती होती. याशिवाय अनेक उल्लेखनीय महिलांचा सन्मान करण्यात आला, ज्यांनी समाजात सुधारणा घडवून नवे विचार रुजवले आहेत. यामध्ये छबुताई वैरागडे, सुवर्णाताई गुहे, संगीताताई लोखंडे, डॉ. भारती दुधानी, दशरथसिंग ठाकुर यांच्यासह अनेक महिलांचा समावेश होता.
कोरोना काळात अथक सेवा बजावणाऱ्या आशा वर्कर्सचा देखील यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सौ. नम्रता पित्तुलवार यांनी केले, तर आभार नलिनी देशमुख यांनी मानले. एकता महिला भजन मंडळाच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.
– प्रा. प्रज्ञा गंधेवार, सचिव, मुक्ती फाऊंडेशन, चंद्रपूर



