तांत्रिक प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत प्रकल्पग्रस्त तरुणचंद्रपूर: प्रकल्पग्रस्तांना तांत्रिक प्रशिक्षणाची प्रतीक्षा; सात वर्षांनंतरही केपीसीएल-शासनातील कराराची अंमलबजावणी नाही
चंद्रपूर/महाराष्ट्र
दिप. 13 अगस्त 2025
सविस्तर बातमी:- चंद्रपूर: महाराष्ट्र शासन आणि कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (KPCL) यांच्यातील करारानुसार, प्रकल्पग्रस्त तरुणांसाठी आवश्यक असलेले तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण अजूनही सुरू झालेले नाही. भाजपच्या अभियंता सेलचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य, इंजि. जगदीश लवाडिया यांनी पत्रकार परिषदेत याकडे लक्ष वेधले आणि तातडीने प्रशिक्षण सुरू करण्याची मागणी केली.
आयटीआय व जड यंत्रसामग्री प्रशिक्षण सुरू करण्याची मागणी
१५ डिसेंबर २०१६ रोजी झालेल्या करारानुसार, प्रकल्पग्रस्तांसाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणे अपेक्षित होते आणि यासाठी १० लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. मात्र, सात वर्षांपेक्षा जास्त काळ उलटूनही या कराराची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे स्थानिक तरुणांना कमी पगाराच्या सुरक्षा रक्षकांसारख्या नोकऱ्यांमध्ये समाधान मानावे लागत आहे. दुसरीकडे, व्हॉल्वो टिपर ऑपरेटर, एक्सकॅव्हेटर ऑपरेटर, मायनिंग इंजिनिअर यांसारख्या कुशल व तांत्रिक पदांवर बाहेरील व्यक्तींना संधी दिली जात आहे.
३१ ऑक्टोबर २०२३ रोजी नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत, केपीसीएलने आयटीआयसाठी १० लाख रुपये आणि इतर विकास कामांसाठी ७८,५७,३३९/- रुपये जिल्हा प्रशासनाकडे जमा केल्याचे स्पष्ट झाले होते. तरीही, अद्याप आयटीआय सुरू झाला नाही किंवा कौशल्य विकास प्रशिक्षणाची अंमलबजावणी झालेली नाही.
या पार्श्वभूमीवर, लवाडिया यांनी तातडीने आयटीआयचे बांधकाम आणि कार्यान्वयन पूर्ण करण्याची, व्हॉल्वो टिपर, एक्सकॅव्हेटर यांसारख्या जड यंत्रसामग्री चालवण्याचे प्रशिक्षण सुरू करण्याची आणि करारानुसार कुशल व तांत्रिक पदांवर स्थानिक तरुणांना प्राधान्य देण्याची मागणी केली.



