
अल्पवयीन विद्यार्थ्यांकडून दुचाकी वाहन चालविण्यावर कारवाईची सूचना
चंद्रपूर, 05 डिसेंबर 2025:
सविस्तर बातमी:- वाहतूक नियंत्रण शाखेने ताडोबा रोड, तुकूम येथील शाळा व महाविद्यालयांना एक महत्वाचे पत्र पाठवून अल्पवयीन (१८ वर्षाखालील) विद्यार्थ्यांकडून दुचाकी चालवण्यावर तातडीने लक्ष घालण्याची सूचना दिली आहे.
वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविणकुमार पाटील यांच्या स्वाक्षरीसह पाठवलेल्या या पत्रामध्ये, मोटार वाहन सुधारणा अधिनियम २०१९ अंतर्गत कलम १९९A चा उल्लेख करण्यात आला आहे. या कायद्यानुसार, जर अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्याची अनुमती दिली गेली, तर पालक किंवा वाहन मालकांना तीन महिन्यांपर्यंत कैदेची शिक्षा किंवा रु. २५,००० पर्यंत दंड भरावा लागू शकतो.
शाळा आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना या कायद्याची माहिती देणे आवश्यक आहे. यासाठी वर्गशिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागरूक करणे, तसेच पालकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ही माहिती पाठवणे गरजेचे असल्याचे पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे.
सदर सूचना पत्र मिळाल्यापासून ४८ तासांच्या आत शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांपर्यंत व पालकांपर्यंत ही माहिती पोहोचवावी. त्यानंतर जर अशा प्रकारची कोणतीही तक्रार प्राप्त झाली, तर वाहन मालक किंवा पालकांची जबाबदारी ठरवली जाईल, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
वाहतूक शाखेने घेतलेला हा निर्णय अपघातांची शक्यता कमी करणे व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. शाळा व महाविद्यालयांनी या सूचनेची तत्काळ अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.



