आरोग्य सेवेत फिजिओथेरपीचे महत्त्व अधोरेखित : चंद्रपूर फिजिओथेरपिस्ट असोसिएशनच्या स्थापनेने घेतला नवा वेग..

39

आरोग्य सेवेत फिजिओथेरपीचे महत्त्व अधोरेखित : चंद्रपूर फिजिओथेरपिस्ट असोसिएशनच्या स्थापनेने घेतला नवा वेग..

चंद्रपुर/महाराष्ट्र 

दि. 10 सेप्टेंबर 2025

संपादक – अनुप यादव ग्लोबल महाराष्ट्र न्यूज 

सविस्तर बातमी:- चंद्रपूर : जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी चंद्रपूर फिजिओथेरपिस्ट असोसिएशनची स्थापना करण्यात आली. यावेळी असोसिएशनच्या कार्यालयाचे भव्य उद्घाटन देखील पार पडले.

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार आ. श्री किशोरभाऊ जोरगेवार उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते रिबन कटिंग करून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. आपल्या भाषणात त्यांनी फिजिओथेरपी हा वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय असल्याचे सांगितले आणि भविष्यात आरोग्य क्षेत्रात त्याची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार असल्याचे स्पष्ट केले.

ज्येष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन मा. डॉ. योगेश सालफळे यांनी फिजिओथेरपी क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर ज्येष्ठ फिजिओथेरपिस्ट मा. डॉ. प्रेमा खत्री यांनी सांगितले की, योग्य आणि न्याय्य फिजिओथेरपी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही असोसिएशन स्थापन करण्यात आली आहे. त्यांनी धोरणात्मक उद्दिष्टांना पाठिंबा, नवोपक्रमांना प्रोत्साहन आणि मानवतेसाठी योगदान देण्याचे आश्वासन दिले.

डॉ. राजेश टोंगे (अध्यक्ष, IDA) यांनी असोसिएशनचे स्वागत करून भविष्यातील उपक्रमांसाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर डॉ. दीपक भट्टाचार्य (अध्यक्ष, NIMA), डॉ. मिलिंद डाभरे (HIMPA), डॉ. गोखरे सर (HIMPA) आणि डॉ. गाणिकर सर (GMP) यांनीही संघाला प्रोत्साहन देत शुभेच्छा दिल्या.

डॉ. पीयूष लोढे, डॉ. आनंद फुलझेले आणि डॉ. नितीन बिस्वास यांनीही मन:पूर्वक शुभेच्छा देऊन असोसिएशनच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी चंद्रपूरमधील फिजिओथेरपी सेवांमध्ये योगदान देणाऱ्या ज्येष्ठ फिजिओथेरपिस्टांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये – डॉ. प्रेमा खत्री, डॉ. किरण सोमकुवर आणि डॉ. रायपुरे मॅडम यांचा समावेश होता.

निवडलेली कार्यकारिणी खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली –

अध्यक्ष – डॉ. भारती गणवीर

सचिव – डॉ. गुरुराज कुलकर्णी

कोषाध्यक्ष – डॉ. मयूर पिसे

कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन डॉ. अश्विनी जुलमे यांनी केले. तर डॉ. मयूर पिसे यांनी असोसिएशनच्या स्थापनेसाठी दाखविलेल्या समर्पणाबद्दल विशेष कौतुक करण्यात आले.

शेवटी, सर्व अतिथी आणि मान्यवरांनी असोसिएशन सदस्यांचे मन:पूर्वक आभार मानले. सदस्यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे हा कार्यक्रम भव्य यशस्वी झाला.