
चंद्रपूर सरकारी रुग्णालयात सार्वजनिक शौचालयांचा अभाव – रुग्ण व नातेवाईकांची गैरसोय
चंद्रपूर/महाराष्ट्र
दि. 11 सेप्टेंबर 2025
संपादक :- अनुप यादव ग्लोबल महाराष्ट्र न्यूज
सविस्तर बातमी :- जिल्ह्यातील प्रमुख सरकारी रुग्णालयात सार्वजनिक शौचालयांचा अभाव असल्याने येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. रुग्णालयातील प्रत्येक ओपीडीला सार्वजनिक स्वच्छतागृह असूनही, ते केवळ रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या वापरासाठीच उपलब्ध करून देण्यात आल्याचा आरोप होत आहे.
या निष्काळजीपणामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या सोबत्यांना रस्त्यावर किंवा रुग्णालयाच्या परिसरातच उघड्यावर शौचालयाची व वॉशरूमची गरज भागवावी लागत आहे. यामुळे रुग्णालयाच्या स्वच्छता व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सर्वात चिंताजनक बाब म्हणजे गर्भवती महिलांनाही तिसऱ्या मजल्यावरून खाली येऊन उघड्यावर बाथरूमला जावे लागते, ही गोष्ट अत्यंत धक्कादायक आणि लाजिरवाणी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी स्त्रीशक्ती महिला फाउंडेशनच्या अध्यक्षा शिल्पाताई कांबळे यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी स्थानिक आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांना निवेदन दिले. तसेच रुग्णालयाचे सीईओ चिंचोलकर साहेब यांना देखील निवेदन सादर करून तातडीने सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था करून रुग्ण व नातेवाईकांच्या सोयीसाठी तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
नागरिकांचा प्रश्न :
सरकारी रुग्णालय हे सर्वसामान्यांचे आधारस्थान असताना, तिथेच स्वच्छतागृहांच्या सुविधांचा अभाव असणे ही मोठी प्रशासनिक बेफिकिरी मानली जात आहे. आता यावर रुग्णालय प्रशासन कोणती पावले उचलते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



